खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील तळेवाडी गावातील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलातून बाहेर येत मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला असून स्थलांतरित झालेल्या या कुटुंबांना मदत म्हणून कर्नाटकचे वन, पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांच्या हस्ते प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
जंगलात मानवी हस्तक्षेप कमी झाल्यास निसर्गाला वाढीसाठी पोषकता उपलब्ध होईल. आजही अनेक कुटुंबे मूलभूत सुविधा नसलेल्या जंगलात राहतात. ही कुटुंबे मुख्य प्रवाहात आणणे ही आपली जबाबदारी आहे. भिमगड वनक्षेत्रात एकूण 13 गावे असून, सुमारे 750 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. यामध्ये तळेवाडीची 27 कुटुंबे सर्वप्रथम स्वेच्छेने स्थलांतरित झाली आहेत, अशी माहिती मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली आहे.
या पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले असून, उर्वरित 5 लाख रुपयांची रक्कम पूर्ण स्थलांतर प्रक्रियेनंतर शासन नियमानुसार देण्यात येणार आहे, असेही मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून या भागात पुनर्वसनाची मागणी प्रलंबित होती. भिमगडमध्ये नागरहोळ व बंदीपूर प्रमाणे इको-टूरिझमला चालना देत जैवविविधता जपली पाहिजे, असे यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याला ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले.
धनादेश वितरण प्रसंगी सुभाष माळकडे ( मुख्य वन्यजीव रक्षक) , राधा देवी ( CAMPA मुख्य कार्यकारी अधिकारी), मोहम्मद रोशन ( बेळगाव जिल्हाधिकारी), डॉ. भीमशंकर गुळेद (पोलीस अधीक्षक), मंजुनाथ चौहान( मुख्य वनसंरक्षक), मारिया क्रिस्तराज (उपवनसंरक्षक) उपस्थित होते.