बागलकोट : दवाखान्यातून नवजात बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला अवघ्या पाच तासांतच जेरबंद करण्यात आले. साक्षी यादवाड खानपेट, ता. रामदुर्ग, जिल्हा बेळगाव असेबाळ चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
" माझ्या बहिणींना मुले झाली, पण मला अजूनही मूल नाही" अशी व्यथा बाळगणाऱ्या साक्षी यादवाड या महिलेने थेट बागलकोट जिल्हा रुग्णालयातून नवजात बाळच चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे केवळ पाच तासांतच ती रुग्णालयातच पकडली गेली.
दोन वर्षांपूर्वी साक्षीने लग्न झाले होते. मात्र तिला अजून मूल झालं नव्हतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती बागलकोट जिल्हा रुग्णालयात सातत्याने उपचार घेत होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, तिला मूल होणे शक्य नाही. यामुळेच तिने नवजात बाळ चोरण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
गर्भवती असल्याचे भासवून वारंवार रुग्णालयात फेऱ्या मारणाऱ्या साक्षीने गेल्या वर्षभर रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांचे निरीक्षण सुरू केले होते. डिलिव्हरी वॉर्ड, ICU, सामान्य वॉर्ड यामध्ये ती नियमितपणे फिरत असे. आणि अखेर तिने योजना बनविली.
साक्षी स्वतःला गर्भवती असल्याचे सांगत आपल्या आई आणि बहिणीसोबत रुग्णालयात दाखल झाली. त्याचवेळी नवनगर, बागलकोट येथील माबूबि नदाफ नावाची महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती आणि रात्री तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. साक्षीने नर्स असल्याचे भासवून “मुलीला थोडा खोकला आहे, तपासणीसाठी नेतो, असे सांगून साक्षीने बाळ नेले.
बाळ बराच वेळ परत न आल्याने माबूबि, तिची आई आणि बहिणीने सगळ्या वॉर्डमध्ये शोधाशोध केली. काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तत्काळ तीन पथके तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली.
इस्पितळातून बाहेर पडता न आल्याने साक्षी बाळासोबत वॉर्डमध्येच थांबली होती. त्यावेळी वॉर्डमधील एका डी ग्रुप कर्मचाऱ्याला तिच्या वागणुकीवर संशय आला. "डिलिव्हरी होऊन काहीच तास झाले आणि ही महिला इतक्या आरामात फिरते आहे, हे शक्य तरी कसं?" असा प्रश्न पडल्याने त्याने ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पोलिसांनी साक्षीची चौकशी केली असता तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]